He that overcometh, the same shall be clothed in white raiment; and I will not blot out his name out of the book of life, but I will confess his name before my Father, and before his angels.
एक दिवस शमुवेल शौलला म्हणाला, “इस्राएलचा राजा म्हणून तुला राज्याभिषेक करायला परमेश्वराने मला पाठवले. आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐक.
सर्व शक्तिमान परमेश्वराचे म्हणणे आहे. “इस्राएल लोक मिसर मधून बाहेर पडले तेव्हा अमालेकींनी त्यांना कनानच्या वाटेवर अडवले. अमालेक्यांचे हे कृत्य मी पाहिले आहे.
तेव्हा आता त्यांच्याशी जाऊन लढ. त्यांचा आणि त्यांच्या मालमत्तेचा पूर्णपणे बीमोड कर. काहीही शिल्लक ठेवू नकोस. पुरुष, बायका, मुले, अगदी तान्ही बाळेसुध्दा मारुन टाक. त्याची गुरे, मेंढरे, उंट, गाढवे या सर्वाचा संहार कर.”
तलाईम येथे शौलाने सर्व सैन्याची जमवाजमव केली. दोन लाखांचे पायदळ आणि यहूदातील दहा हजार माणसे त्यात होती.
मग शौल अमालेक नगरापाशी जाऊन एका खोऱ्यात दबा धरुन बसला.
केनी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही अमालेक्यांची संगत सोडून दूर निघून जा. म्हणजे मग आम्ही अमलेक्यांच्या बरोबर तुमचा नाश करणार नाही. कारण मिसरमधून इस्राएल बाहेर पडले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागला होता.” तेव्हा केनी लोक अमालेक्यांना सोडून निघून गेले.
शौलने अमालेक्यांचा पराभव केला. हवीलापासून मिसरच्या हद्दीजवळच्या शूरपर्यंत त्याने अमालेक्यांचा पाठलाग केला.
अगाग हा अमालेक्यांचा राजा होता. त्याला शौलने ताब्यात घेतले. त्याला जिवंत ठेवून बाकी अमालेकी लोकांना त्याने कापून आणले.
सर्वच गोष्टींचा संहार करायचे शौलच्या आणि त्याच्या सैन्याच्या जिवावर आले. म्हणून त्यांनी अगागला जिवंत ठेवले. तसेच धष्टपुष्ट गुरे. उत्तम मेंढरे, कोकरे आणि काही चांगल्या ठेवण्यायोग्य गोष्टी त्यांनी ठेवल्या. जे टाकाऊ आणि कुचकामी त्याचा नाश केला.
यानंतर शमुवेलला परमेश्वरा कडून संदेश आला.
परमेश्वर त्याला म्हणाला, “शौला आता मला अनुसरत नाही. त्याला राजा केले याचे मला दु:ख होते. माझ्या सांगण्याप्रमाणे तो आता वागत नाही. शमुवेलला हे ऐकून फार खेद वाटला. रात्रभर त्याने अश्रू ढाळत परमेश्वराची प्रार्थना केली.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून तो शौलला भेटायला गेला. पण तिथे गेल्यावर त्याला कळले की शौल यहूदातील कर्मेल येथे गेला आहे. तिथे स्वत:च्या सन्मानार्थ एक दगडी स्तंभ उभारुन अनेक गावे फिरुन तो गिलगाल येथे येणार आहे.तेव्हा शौल होता त्या ठिकाणी शमुवेल गेला. तिथे अमालेक्याच्या लुटीतील पहिला भाग परमेश्वरासाठी शौलने नुकताच यज्ञात अर्पण केला होता.
शमुवेल शौलजवळ पोचला तेव्हा शौलने त्याला अभिवादन केले. तो म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो. मी परमेश्वराच्या आज्ञेत आहे.”
तेव्हा शमुवेल म्हणाला, “मग मला हा कसला आवाज ऐकायला येत आहे? शेरडामेंढरांचे केकारणे आणि गुरांचे हंबरणे याचा अर्थ काय?”
शौल म्हणाला, “सैनिकांनी ती गुरे अमाले क्यांकडून लुटीत आणली आहेत. प्रभु परमेश्वरासाठी यज्ञ अर्पण करायला म्हणून त्यांनी उत्तमोत्तम गुरेमेंढरे बाजूला ठेवली आहेत. बाकीच्या सगळ्याचा मात्र आम्ही संहार केला.”
यावर शमुवेल शौलला म्हणाला, “बस्स कर! काल रात्री परमेश्वर माझ्याशी काय बोलला ते सांगतो.”शौल म्हणाला, “बरे तर, सांगा.”
शमुवेल सांगायला लागला, “पूर्वी तू स्वत:ला मोठा समजत नव्हतास. पण तू सर्व इस्राएलांचा प्रमुख बनलास. परमेश्वराने तुला राजा म्हणून नेमले.
परमेश्वराने तुला विशेष कामगिरीवर पाठवले. तो म्हणाला, ‘सर्व अमालेक्यांच्या संहार कर. ते नीच असल्याने त्यांना शिल्लक ठेवू नको. त्यांची नावनिशाणीही उरु देऊ नको.
पण तू परमेश्वराचे ऐकले नाहीस. तुला या गोष्टी ठेवायच्या होत्या म्हणून परमेश्वराने जे करु नको म्हणून सांगितले ते तू केलेस.”
शौल म्हणाला, “पण मी तर परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. त्याने पाठवले तिकडे मी गेलो. सर्व अमालेक्यांना नष्ट केले. राजा अगाग याला तेवढे मी परत आणले.
आणि सैनिकांनी जी निवडक गुरेमेंढरे घेतली ती गिलगाल येथे यज्ञात तुमचा देव परमेश्वर ह्याला अर्पण करण्यासाठी.”
पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वर जास्त प्रसन्न कशामुळे होईल? यज्ञ आणि होमार्पणे देऊन की त्याच्या आज्ञा पाळल्याने? त्याच्यासाठी यज्ञ करण्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळणे केव्हाही श्रेयस्कर. मेंढराची चरबी त्याला वाहण्यापेक्षा त्याचे ऐकणे चांगले.
परमेश्वराची अवज्ञा करणे हे जादूटोण्याचे पाप करण्या इतकेच वाईट. आडमुठेपणाने आपल्याला हव ते करणे हे मूर्तीपूजेसारखंच पातक आहे. तू परमेश्वराचा आज्ञाभंग केलास. तेव्हा परमेश्वरालाही तू राजा असणे आता मान्य नाही.”
तेव्हा शौल शमुवेलला म्हणाला, “माझ्या हातून पाप झाले आहे. मी परमेश्वराचे वचन पाळले नाही. तुम्ही सांगितले तसे वागलो नाही. लोकांचा मला धाक वाटला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वागलो.
पण आता या पापाबद्दल मला क्षमा करा. मी तुम्हाला ही विनवणी करतो. माझ्या बरोबर चला. मी परमेश्वराची उपासना करीन.”
पण शमुवेल म्हणाला, “मी आता तुझ्याबरोबर परत येणार नाही. तू परमेश्वराचा शब्द मोडलास तेव्हा परमेश्वरही तुला इस्राएलच्या राजेपदावरुन झुगारुन देत आहे.”
एवढे बोलून शमुवेल जायला निघाला तेव्हा शौलने त्याच्या अंगरख्याचे टोक धरुन त्याला थोपवायचा प्रयत्न केला. यात अंगरखा फाटला.
शमुवेल म्हणाला, “तू हा अंगराखा फाडलास तसे इस्राएलचे राज्य तुझ्याकडून परमेश्वराने हिसकावून घेतले आहे. तुझ्याच एका मित्राकडे ते सोपवले आहे. तो तुझ्या पेक्षा भला आहे.
परमेश्वर इस्राएलचा देव असून तो सर्वकाळ आहे. परमेश्वर आपला शब्द फिरवत नाही की विचार बदलत नाही. माणसासारखा तो चंचल नव्हे.”
शौल म्हणाला, “ठीक आहे माझ्याहातून पाप झाले आहे. पण कृपाकरुन माझ्या बरोबर परत चल. इस्राएलचे लोक आणि अधिकारी मंडळी यांच्यासमोर माझा अवमान करु नको. तू बरोबर चल. मग मी प्रभु परमेश्वराची उपासना करतो.”
शमुवेल त्या प्रमाणे शौलबरोबर गेला. शौलने परमेश्वराची उपासना केली.
शमुवेल म्हणाला, “आता अमालेक्यांचा राजा अगाग याला माझ्या समोर आणा.”अगाग आला. त्याला साखळदंडांनी बांधले होते. त्याला वाटले, “हा काही आपला जीव घेणार नाही.”
पण शमुवेल अगागला म्हणाला, “तुझ्या तलवारीने तू मुलांना आई वेगळे केलेस. आता तुझ्या आईची गतीही तशीच होईल.” आणि त्याने गिलगाल येते परमेश्वरासमोर अगागचे तुकडे तुकडे केले.
मग शमुवेल तिथून निघाला. तो रामा येथे गेला. शौल आपल्या गिबा येथील घरी परतला.
पुढे आयूष्यभर शमुवेलला शौलचे दर्शन झाले नाही. शौलबद्दल त्याला फार वाईट वाटले. शौलला इस्राएलचा राजा केल्याबद्दल परमेश्वरालाही खेद झाला.