Be strong and of a good courage, fear not, nor be afraid of them: for the LORD thy God, he it is that doth go with thee; he will not fail thee, nor forsake thee.
“तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की इस्राएल लोकांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहाणाऱ्या परदेशीयापैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या माणसाला जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्याला धोंडमार करावा!
मीही त्या माणसाच्या विरुद्ध होईन! आणि त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन! कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नांवाला कलंक लावला!
मोलख दैवताला आपले मूल अर्पिण्याकडे देशाचे इतर सामान्य लोक डोळेझांके करुन त्याला जिवे मारणार नाहीत.
तर मी त्या माणसाच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरुद्ध होईन! आणि त्याला व मजवर अविश्वास दाखवून जे कोणी मोलख दैवताच्या नादी लागून त्याच्या मागे जातील त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकीन!
“जो माणूस सल्लामसलत विचारण्यास पंचाक्षऱ्याकडे व चेटक्याकडे जातो तो माझ्याशी विश्वासघात करीत आहे.मी त्याच्या विरुद्ध होईन व त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.
“म्हणून पावन व्हा! आपणास पवित्र करा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे!
तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा; तुम्हाला पवित्र करणारा मीच परमेश्वर आहे!
“जो माणूस आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे;त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
“जो माणूस आपल्या शेजाऱ्याच्या बायकोपाशी जातो तो माणूस व ती स्त्री, ती दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या जाराला व जारिणीला अवश्य जिवे मारावे.
जो आपल्या बापाच्या बायकोपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो माणूस व त्याच्या बापाची बायको त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
“एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
“एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथीं राहील.
“कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी ह्या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये!
कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे.
कोणी स्त्री पशूगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशूला जिवे मारावे; त्यांना अवश्य मारुन टाकावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
“कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करुन घेईल व ती दोघे शरीरसंबंध करतील तर ते लाजीरवाणे कर्म आहे! त्या दोघांना आपल्या भाऊबंदादेखत शिक्षा व्हावी! त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
“ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीर संबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही त्यांच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्यांने तिच्या रक्ताचा झरा उघडा करुन पाप केले आहे.
आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नयेत व तसे करणाऱ्याच्या हातून मात्रागमनाचे पाप घडेल, त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी.
“कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील.
आपल्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे; जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल! त्यांना संततीहोणार नाही.
“म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम ह्यांची आठवण ठेवून ते पाळावे म्हणजे ज्या देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्यात तुमची वस्ती होईल; तो देश तुमचा त्याग करणार नाही.
ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढून घालवून देत आहे त्यांनी असली सर्व पापी कृत्ये केली म्हणून मला त्यांचा वीट आला! तुम्ही त्यांच्या रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका.
“मी तुम्हास सांगितले आहे की त्यांचा देशतुमचे वतन होईल! तो मी तुमच्या ताब्यात देत आहे.“त्यात दुधामधाचे प्रवाह वाहात आहेत; इतर राष्ट्रापासून वेगळे करुन मी तुम्हाला माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशू व शुद्ध व अशुद्ध पक्षी ह्यांच्यातील भेद पाळावा, आणि जे पशू, पक्षी व जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये.
तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे; तुम्ही माझ्याकरिता पवित्र व्हावे! कारण मी तुमचा परमेश्वर आहे आणि मी पवित्र आहे!
कोणी पंचाक्षरी किंवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे; लोकांनी त्यांना धोंडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.”