That if thou shalt confess with thy mouth the Lord Jesus, and shalt believe in thine heart that God hath raised him from the dead, thou shalt be saved.
परमेश्वर देव दर्शनमंडपातून मोशेला हाक मारुन म्हणाला,
“इस्राएल लोकांना असे सांग: की जेव्हा तुम्ही परमेश्वराला पशूबली अर्पिता तेव्हा तो प्राणी तुमच्या पाळीव गुराढोरांच्या खिल्लारांतील किंवा शेरडांमेढारांच्या कळपातील असावा.
“जेव्हा एखाद्या माणसाला गुरांढोरांतले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोष नसलेला नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वर ते अर्पण मान्य करील.
त्या माणसाने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल.
“त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे.
याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व मग त्याच्या शरीराचे तुकडे करावे.
नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी;
त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्या पशूचे तुकडे, डोके व चरबी रचावी;
त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी, मग याजकाने सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी आहे; त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.
“कोणाला कळपामधून शेरडू वा मेंढरु होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोष नसलेला नर अर्पावा.
त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोंवती शिंपडावे.
मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी.
त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; त्याच्यामुळे परमेश्वराला संतोष होतो.
“जेव्हा कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने होले किंवा पारव्याची पिले आणावी.
याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगाळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.
त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी.
त्याने तो पक्षी पंखाच्या तेथून फाडावा, परंतु त्याने त्याचे दोन भाग वेगळे करु नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.