That if thou shalt confess with thy mouth the Lord Jesus, and shalt believe in thine heart that God hath raised him from the dead, thou shalt be saved.
हिज्कीया यहुदाचा राजा होता. सन्हेरीब अश्शूरचा राजा होता. हिज्कीयाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी सन्हेरीबने यहुदाच्या तटबंदी असलेल्या नगरांविरूध्द उठाव केला आणि त्यांचा पाडाव केला.
सन्हेरीबने आपल्या सेनापतीला यरूशलेमवर स्वारी करण्यासाठी पाठविले. सेनापती लाखीशहून निघाला आणि यरूशलेममध्ये हिज्कीया राजाकडे गेला. त्याने आपले शक्तिशाली सैन्य बरोबर घेतले होते. परटाच्या शेताजवळच्या रस्त्याकडे ते गेले हा रस्ता वरच्या डोहातून पाणी वाहून आणणाऱ्या चराजवळ होता.
यरूशलेममधील तिघेजण सेनापतीशी बोलणी करण्याकरिता गेले. हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम, आसाफचा मुलगा यवाह आणि शेबना हे ते तिघे होत. ह्यातील एल्याकीम हा राजाचा कारभारी होता. यवाह हा राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा होता. तर शेबना राजाचा चिटणीस होता.
सेनापती त्या तिघांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीया राजाला अश्शूरचा महान राजा काय सांगतो ते सांगा.सम्राटाचे म्हणजेच अश्शूरच्या राजाचा असा प्रश्र्न आहे की, तुला मदत मिळावी म्हणून तू कशावर पूर्णपणे विश्वास ठेवतोस?
सामर्थ्याच्या व चातुर्याच्या योजना ह्यावर तू विश्वास ठेवत असशील तर ते सगळे पोकळ आहे हे मीच तुला सांगतो. मग तू माझ्याविरूध्द का लढत आहेस? आता मी तुला असे विचारतो की तू तुझ्या मदतीसाठी कोणावर विश्वास ठेवतोस?
तू त्यासाठी मिसरवर विसंबतोस का? पण मिसर पिचलेल्या काठीसारखा आहे. तू त्याच्यावर आधारासाठी टेकलास तर तुला फक्त इजा होईल आणि तुझ्या हाताला जखम होईल. मिसरवर मदतीसाठी अवलंबून असलेले कोणीही मिसरचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवू शकत नाही.”
तू कदाचित् म्हणशील” आम्हाला मदत मिळावी म्हणून मी परमेश्वर, आमचा देव, ह्यावर पूर्णपणे विश्वास टाकतो.” पण मी सांगतो की हिज्कीयाने देवाच्या वेद्या व पूजेसाठी असलेली उच्चासने ह्यांचा नाश केला. हे खरे आहे हो ना? आणि हे ही खरे आहे की हिज्कीयाने यहुदाला आणि यरूशलेमला सांगितले “तुम्ही यरूशलेममध्ये असलेल्या वेदीचीच फक्त पूजा करा.”
तुम्हाला अजूनही आमच्याशी लढायचे असेल तर माझा प्रभु, अश्शूरचा राजा, तुमच्याबरोबर एक करार करील. तो असा तुमच्याकडे दोन हजार घोड्यांवर स्वार होऊन लढण्यास पुरेसे घोडेस्वार असतील तर मी तुम्हाला दोन हजार घोडे देईन.
पण एवढे केले तरी तुम्ही आमच्या राजाच्या एका गुलामालासुध्दा हरवू शकणार नाही. त्याच्या सर्वांत खालच्या पातळीवर असलेल्या अधिकाऱ्याचाही पराभव करू शकणार नाही. मग तुम्ही मिसरच्या घोड्यांवर व रथांवर का अवलंबून राहता?
शिवाय हेही लक्षात ठेवा की मी या देशात येऊन लढलो तेव्हा परमेश्वर माझ्याच बाजूला होता. मी शहरांचा नाश केला तेव्हा परमेश्वर माझ्याच पाठीशी होता. परमेश्वरानेच मला सांगितले, “ऊठ ह्या देशात जा आणि त्याचा नाश कर.”
एल्याकीम, शेबना व यवाह ह्या यरूशलेममधल्या तिघांनी सेनापतीला सांगितले, “कृपया आमच्याशी अरामी भाषेत बोला. आमच्या यहुदी भाषेत बोलू नका. तुम्ही यहुदी भाषेत बोललात तर कोटावरील लोकांना तुमचे बोलणे समजेल.”
पण सेनापती म्हणाला “माझ्या स्वामीने, मला, ह्या गोष्टी, फक्त तुम्हाला किंवा तुमच्या हिज्कीया राजालाच सांगण्यासाठी पाठविलेले नाही. कोटाच्या भिंतींवर बसलेल्या लोकांनाही हे सांगण्यासाठी मला माझ्या राजाने पाठविले आहे. त्या लोकांनाही पुरेसे अन्न वा पाणी मिळणार नाही. त्यांनाही तुमच्याप्रमाणेच स्वत:ची विष्ठा खावी लागेल व स्वत:चे मूत्र प्यावे लागेल.”
नंतर सेनापती उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहुदी भाषेत बोलला.
सेनापती म्हणाला, “सम्राटाचे म्हणजे अश्शूरच्या राजाचे म्हणणे ऐका:हिज्कीयाकडून तुम्ही फसवले जाऊ नका. तो तुमचे रक्षण करू शकणार नाही.
‘परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वर तुमचे रक्षण करील. परमेश्वर अश्शूरच्या राजाकडून शहराचा पराभव होऊ देणार नाही.’ असे हिज्कीया म्हणेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवू नका.
हिज्कीयाचे हे म्हणणे ऐकू नका. अश्शूरच्या राजाचे म्हणणे ऐका. अश्शूरचा राजा म्हणतो, “आपण एक करार करू तुम्ही शहराबाहेर माझ्याकडे यावे. नंतर प्रत्येकाला घरी जाण्यास मोकळीक मिळेल. प्रत्येकाला आपापल्या द्राक्षवेलींची द्राक्षे व आपापल्या अंजिराच्या झाडाची अंजिरे खाण्यास मुभा मिळे. प्रत्येकाला स्वत:च्या विहिरीचे पाणी पिता येईल.
मी परत येऊन तुमच्यातील प्रत्येकाला स्वदेशच वाटावा अशा देशात घेऊन जाईपर्यंत तुम्हाला असे राहता येईल. त्या नव्या देशात तुम्हाला चांगले अन्नधान्य व नवे मद्य मिळेल. त्या देशात अन्नधान्य व द्राक्षमळे असतील.”
हिज्कीयाकडून फसवले जाऊ नका. तो म्हणतो, “परमेश्वर आपल्याला वाचवील.” पण मी तुम्हाला विचारतो की कोठल्या राष्ट्रतील देवाने आपल्या राष्ट्रातील लोकांना अश्शूरच्या सामर्थ्यापासून वाचाविले आहे? कोणीही नाही. आम्ही त्या प्रत्येकाला पराभूत केले.
हमाथ आणि अर्पाद यांचे देव कोठे आहेत? ते हरले आहेत. सफखाईमचे देव कोठे आहेत? तेही हरले. आहेत शोमरोनच्या देवांनी तेथील लोकांना माझ्या सामर्थ्यापसून वाचविले का? नाही.
माझ्या सामर्थ्यापासून एखाद्या राष्ट्रातील लोकांना वाचविले आहे अशा एका तरी देवाचे नाव मला सांगा. मी त्या सर्वांचा पराभव केला. म्हणूनच म्हणतो की परमेश्वर माझ्या सामर्थ्यापासून यरूशलेमला वाचवू शकणार नाही.”
यरूशलेममधील लोक अगदी शांत होते त्यांनी सेनापतीला उत्तर दिले नाही. “सेनापतीला उत्तर देऊ नका” असा हुकूम हिज्कीयाने त्यांना दिला होता.
नंतर राजाचा कारभारी (हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम) राजाचा चिटणीस (शेबना) व राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा (आसाफचा मुलगा यवाह) ह्यांनी आपले कपडे फाडले, (ह्याचा अर्थ त्यांना फार दु:ख झाले होते.) ते तिघे हिज्कीयाकडे गेले व त्यांनी सेनापतीचे सर्व म्हणणे त्याला सांगितले.