But love ye your enemies, and do good, and lend, hoping for nothing again; and your reward shall be great, and ye shall be the children of the Highest: for he is kind unto the unthankful and to the evil.
अब्राहामाने ते ठिकाण सोडले व तो नेगेबकडे म्हणजे यहूदा प्रांताच्या दक्षिणेकडील वाळवंटाच्या भागाकडे प्रवास करीत गेला, आणि कादेश व शूर यांच्या दरम्यान असलेल्या गरार नगरात त्याने वस्ती केली; गरारात असताना
अब्राहामाने सारा आपली बहीण असल्याचे लोकांना सांगितले. गराराचा राजा अबीमलेख याने हे ऐकले. त्याला सारा हवी होती म्हणून त्याने काही माणसे पाठवून तिला राजवाड्यात आणले.
परंतु रात्री देव अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू आता नक्की मरशील कारण तू आणलेली स्त्री विवाहित आहे.”
अबीमलेखाने अद्याप साराला स्पर्श केला नव्हता. तेव्हा अबीमलेख म्हणाला, “प्रभु, मी दोषी नाही, मग एका निरपराध माणसाला तू मारुन टाकणार काय?
कारण अब्राहामाने स्वत: मला सांगितले की, ‘ही स्त्री माझी बहीण आहे,’ आणि त्या स्त्रीने ही सांगितले की, ‘हा माझा भाऊ आहे,’ तेव्हा मी निरपराधी आहे; मी काय करीत होतो हे मला कळले नाही.”
मग देव अबीमलेखाला स्वप्नात म्हणाला, “होय! मला माहीत की तू निरपराधी आहेस आणि तसेच तू काय करत होता हे तुला कळले नाहीं; म्हणूनच मी तुला वाचविले आणि माझ्या विरुद्ध तू पाप करु नयेस म्हणून मी तुला आवरले; आणि मीच तुला साराला स्पर्श करु दिला नाही.
तेव्हा आता तू अब्राहामाची बायको त्याची त्याला परत दे; अब्राहाम माझ्या वतीने बोलणारा संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील; परंतु तू सारेला अब्राहामाकडे परत पाठवले नाहीस तर मग मी सांगतो की तू आणि तुझ्या बरोबर तुझे सर्व कुटुंबीय खात्रीने मराल.”
दुसऱ्या दिवशी पहाटे अबीमलेखाने आपल्या सर्व सेवकांना बोलावून त्याने स्वप्नात पाहिलेल्या सर्वगोष्टी त्यांना सांगितल्या; ते सर्वजण फार घाबरले.
मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून आणले व म्हटले, “तू हे असे आम्हाला का केलेस? मी तुझे काय वाईट केले? मी तुझ्याविरुद्व काय गैर वागलो? तू असे खोटे का बोललास की ती तुझी बहीण आहे? तू माझ्या राज्यावर मोठे संकट आणलेस; तू माझ्याशी अशा गोष्टी करायच्या नव्हत्या.
तुला कशाची भीती वाटली? अशा रीतीने तू माझ्याशी का वागलास?”
मग अब्राहाम म्हणाला, “मला भीती वाटली येथील कोणीही लोक देवाचे भय धरीत नाहीत असे मला वाटले आणि म्हणून माझी बायको सारा मिळविण्यासाठी कोणीही मला ठार मारील असे मला वाटले.
ती माझी बायको आहे हे खरे आहे, तरी पण ती माझी नात्याने बहीण लागते हे ही तितकेच खरे आहे; कारण ती माझ्या बापाची मुलगी आहे पण माझ्या आईची ती मुलगी नाही.
देवाने मला माझ्या बापाच्या घरापासून दूर नेले आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी भटकायला लावले; आणि असे झाले तेव्हा मी साराला सांगितले, ‘माझ्यासाठी एवढे कर की आपण जिकडे जाऊ तिकडे तू माझी बहीण आहेस असे लोकांना सांग.”‘
हे समजल्यावर अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्याला मेंढरे, बैल व दास दासीही दिल्या.
अबीमलेख म्हणाला, “तुझ्या अवती भोवती चौफेर नजर टाक; हा सर्व माझा देश आहे; तुला पाहिजे तेथे तू राहा.”
अबीमलेख सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी एक हजार चांदीची नाणी दिली आहेत; यासाठी की तेणेकडून, ह्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वाबद्दल मला दु:ख होत आहे, हे इतरास समजावे आणि माझा न्यायीपणा व निरपरधीपणा व तुझी शुद्धता सर्व लोकांना कळावीत.”
परमेश्वराने अबीमलेखाच्या कुटुंबातील सर्व स्त्रियांची गर्भाशये त्यांना मुले होऊ नयेत म्हणून बंद केली होती; देवाने हे केले कारण अबीमलेखाने अब्राहामाची बायको सारा हिला त्याच्या घरी नेले होते; परंतु अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची बायको आणि त्याच्या दासी यांना मुले न होण्याच्या दोषापासून बरे केले.